शहाद्यातील युवतीवर लैंगिक अत्याचार सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी..!
प्रतिनिधी कैलास सोनवणे
शहादा शहरातील २३ वर्षीय युवतीला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मालेगाव येथील एकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी रात्री उशिरा मालेगाव येथील एकाविरोधात शहादा पोलीसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे
मिळालेल्या माहिती नुसार शहादा शहरातील एका २३ वर्षीय युवतीची मालेगाव येथील मोहम्मद आबिद हसन याच्यासोबत सोशल मिडियातून ओळख झाली होती. दीड वर्षांपूर्वी झालेल्या या ओळखीतून दोघांच्या भेटी झाल्या होत्या. यादरम्यान संशयिताने युवतीला मालेगाव येथे एका हॉटेलवर नेऊन अत्याचार केला होता. या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास युवती आणि कुटूंबियांची बदनामी करण्याची धमकी दिली होती. तसेच युवतीचे फोटो व व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे धमकी दिली होती. युवतीने बदनामीच्या भितीने ही माहिती कुणालाही दिली नव्हती. दरम्यान हिंमत वाढलेला संशयित मोहंमद आबिद हसन हा शुक्रवारी दुपारी शहादा येथे आला होता. याठिकाणी येऊन संशयिताने युवतीला शहरातील महात्मा गांधी उद्यानात बोलावले असता संशयित तिला धमकावत असताना,नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली होती. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून माहिती जाणून घेतल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला.आरोपीच्या मोबाइलमध्ये आढळून आले फोटो व व्हिडीओ पोलीसांनी संशयित आबिद हसन याला ताब्यात घेत मोबाईलची तपासणी केली असता, त्याच्या मोबाइलमध्ये अनेक फोटो आणि व्हिडीओ मिळून आले. याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून मोहम्मद आबिद हसन याच्याविरोधात लैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहादा पोलीस ठाणे परिसरात युवतीच्या नातलगानी गर्दी केली होती उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश देसले या प्रकरणाचा तपास करत आहेत.