नवापूर, दि. १० जून – नवापूर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नवापूर नगर परिषदेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाड्या लावून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाडीधारकांना नगर परिषदेकडून तातडीने गाड्या हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या उभ्या राहिल्यामुळे वाहनधारकांना वाहतुकीदरम्यान गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा अपघाताची शक्यता निर्माण होते तसेच रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन वाहने देखील या अडथळ्यांमुळे अडकून पडतात. याच पार्श्वभूमीवर नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी बांधकाम विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
या आदेशानंतर, नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने विवेक भामरे (बांधकाम अभियंता) यांच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्यावर हातगाड्या लावणाऱ्या दुकानदारांना तोंडी स्वरूपात सूचना देण्यात आल्या आहेत. "दोन ते तीन दिवसांच्या आत हातगाड्या न हटविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असा स्पष्ट इशारा यावेळी श्री.भामरे यांनी दिला.
नगर परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार असून, सुरुवातीला समज देण्यात येईल. मात्र, सूचना न पाळल्यास दंडात्मक कारवाई तसेच हातगाड्या जप्त करण्याचीही शक्यता आहे.
या मोहिमेत बांधकाम विभागाचे कमलेश महाले,राहुल बि-हाडे,चेतन चव्हाण इतर कर्मचारी सहभागी असून नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शहरातील स्वच्छता, शिस्तबद्ध वाहतूक आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.