जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरांवर प्रभावी नियोजन व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.-डॉ. मित्ताली सेठी
संभाव्य आपत्ती वर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या संपूर्ण तयारीबाबत आज झालेल्या पत्राकर परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरांवर प्रभावी नियोजन व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. आणि निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने दिनांक 07 मे, 28 मे आणि 20 जून 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व संबंधित विभागांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर स्वतंत्रपणे मान्सूनपूर्व तयारीच्या बैठकांचे आयोजन केले असून, अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी स्वतः या बैठकीस उपस्थित होत्या.
आपत्तीप्रवण क्षेत्र, उपलब्ध साधनसामग्री आणि संपर्क यंत्रणा याबाबतची अद्ययावत माहिती तयार करून महसूल, पोलीस, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, नगरपरिषद आदी विभागांनी जिल्हा, तालुका आणि नगरपालिका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार केले आहेत.
आदिवासी व दुर्गम भागांतील 60 गावांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत मान्सूनपूर्व धान्यवाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व लघु व मध्यम प्रकल्पांची पाहणी करून संबंधित जलसंपदा विभागाने धरणे व तलाव आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्पदंशाच्या लसींचा (ASV) पर्याप्त साठा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा देखील राखण्यात आलेला आहे.
पशुसंवर्धन विभागाने आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पथके स्थापन केली असून, त्यांनी देखील आवश्यक औषधसाठा पूर्वतयारीच्या दृष्टीने तयार ठेवला आहे.
जिल्हा आणि तालुका स्तरावर महसूल, पोलीस, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, दुरसंचार, कृषी, नगरपरिषद आदी विभागांचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत. आपत्तीच्या प्रसंगी या नियंत्रण कक्षांशी समन्वय साधून त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहेत.
भारतीय हवामान खाते, जलसंपदा विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या पूर्वसूचना संबंधित विभागांना वेळेवर कळविल्या जातात आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतात. गाव पातळीवर दवंडीच्या माध्यमातूनही माहिती प्रसारित केली जाते.
०००००००००००००००००