जिल्ह्यात ‘ग्रामसंवाद अभियान’ राबविण्याचा निर्णय
प्रत्येक आठवड्यात प्रशासन थेट ग्रामीण भागात; समस्या ऐकून जागेवरच तोडगा काढणार
नंदुरबार, दिनांक 15 जुलै, 2025 (जिमाका) :
गाव म्हणजे विकासाचे खरे मूळस्थान. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असल्याने या भागाच्या विकासाशिवाय देशाच्या सर्वांगीण प्रगतीची कल्पना अशक्य आहे. प्रशासन व ग्रामीण जनता यांच्यातील दुरावा कमी करून परस्पर विश्वासाचे नवे दुवे निर्माण करण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून ‘ग्रामसंवाद अभियान’ 1 ऑगस्ट 2025 पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
‘ग्रामसंवाद अभियान’गरज आणि पार्श्वभूमी
वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात कार्यालयीन प्रक्रिया डिजिटल झाली असली तरी ग्रामीण भागातील सामान्य माणसाचा महसूल प्रशासनाशी थेट सुसंवाद कमी झाला आहे. एखादी घटना घडल्यास ती प्रशासनाच्या लक्षात येण्याआधी ती प्रसारमाध्यमांतून समजते. तसेच अनेकदा गावकऱ्यांना आपल्या दैनंदिन कामकाजासाठी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावे लागते. त्यामुळे वेळ, खर्च आणि श्रम यांची मोठी हानी होते. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून जिल्हा प्रशासनाने “गावातच प्रशासन” या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी ‘ग्रामसंवाद’ ही योजना आखली आहे.
अभियानाचा उद्देश
• प्रशासन आणि ग्रामीण जनतेमधील संवाद सशक्त करणे
• नागरिकांच्या अडचणी गावातच समजून घेणे आणि त्या तात्काळ सोडवणे
• विविध शासकीय विभागांमधील समन्वय वाढवून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देणे
• प्रत्येक गावात सरकारी सेवांचे वास्तव स्वरूप समजून घेणे व त्रुटी दुरुस्त करणे
अशी करणार अभियानाची अंमलबजावणी
• प्रत्येक आठवड्यात प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी किमान २ दुर्गम गावांना भेटी द्याव्यात.
• नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे व शक्य असेल तिथेच उपाय करणे.
• या दौऱ्यात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पोस्ट ऑफिस, बँक, विजवितरण तलाठी व ग्रामसेवकांचे कार्यालय, कृषी कार्यालय, इ. ठिकाणी त्यांच्या अधिकारी /कर्मचारी यांच्यासोबत भेट देऊन कामकाजाचा आढावा घेणे.
• प्रत्यक्ष भेटीमुळे कार्यपद्धतीतील त्रुटी समोर येतील व त्यावर उपाययोजना करता येतील.
• या अभियानाचा मासिक आढावा अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या मार्फत घेतला जाणार आहे.
नियोजनाची तयारी
• अभियानाची सुरुवात 1 ऑगस्ट 2025 पासून होणार आहे.
• जुलै महिन्यापासूनच नियोजन सुरू करावे लागणार असून, भेट दिल्या जाणाऱ्या गावांची यादी तयार करणे आवश्यक आहे.
• गावांची नावे, दिनांक, वेळ याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास 30 जुलै 2025 पर्यंत सादर करावी, जेणेकरून जिल्हास्तरीय अधिकारीदेखील त्या भेटीत सहभागी होऊ शकतील.
अपेक्षित फायदे
• नागरिकांना अनेक शासकीय सेवा गावपातळीवरच उपलब्ध होतील.
• तहसील, उपविभागीय कार्यालयापर्यंतच बहुतेक कामे निकाली निघतील.
• जिल्हा स्तरावर जाण्याची आवश्यकता कमी होईल.
• वेळ, श्रम आणि खर्च वाचेल.
• तक्रारींच्या संख्येत घट होईल.
• शासन-प्रशासनाची प्रतिमा जनमानसात अधिक सकारात्मक व विश्वासार्ह होईल.
यातून शासनाच्या कामकाजाबद्दलचा विश्वास वाढेल !
डॉ. मित्ताली सेठी
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी याबाबत आपले विचार स्पष्ट करताना म्हटले आहे की, “ग्रामसंवाद अभियानाचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्या जागेवरच सोडवणं. यातून शासनाच्या कामकाजाबद्दलचा विश्वास वाढेल. सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वी करावे, हीच अपेक्षा आहे.”
जनतेच्या मनातील प्रशासकीय दुरावा कमी होणार
धनंजय गोगटे
नंदुरबार जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला ‘ग्रामसंवाद’ अभियान हा ग्रामीण भागात सुशासन पोहोचवण्याचा आणि जनतेच्या मनातील प्रशासकीय दुरावा कमी करण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. गावात प्रशासन पोहोचल्याने जनतेच्या अडचणी अधिक जलद सोडवता येतील आणि लोकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक घट्ट होईल. ‘गावात प्रशासन, गावात संवाद’ या मंत्राने ग्रामीण विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असे या अभियानाबद्दल बोलताना अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी सांगितले.
००००००००००