पोस्टात आलेले आधारकार्ड, कोर्टाच्या नोटीसा, बँकेचे चेकसह विविध महत्वाची कागदपत्रे उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार धडगाव येथे घडल्याने उघडकीस आला आहे. यातून पोस्ट कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा करीत नागरीकांपर्यंत सदर कागदपत्रे वाटप न करता परस्पर कचऱ्यात फेकून दिल्याने नागरीकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.धडगाव तालुका हा सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेला असल्याने दुर्गम भागातील गावपाड्यांवरील नागरीक आधार कार्डसह विविध महत्वाच्या कामासाठी धडगाव येथे तालुक्याच्या ठिकाणी
येतात. तसेच त्या कागदपत्रांसाठी त्यांना खर्चही करावा लागतो.परंतू सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सदरची महत्वाची कागदपत्रेही Iनागरीकांना पोस्ट कार्यालया मार्फत उपलब्ध होत असतात. मात्र पोस्टामार्फत येणारी कागदपत्रे ही नागरीकांपर्यंत पोहोचत नसून ती उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धडगाव येथे दीड हजाराहून अधिक नागरीकांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, धनादेश, कोर्टाच्या नोटीसा अशी महत्वाची कागदपत्रे उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.ही सर्व कागदपत्रे नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्टात आलेली होती, अशी चर्चा आहे. परंतू ही कागदपत्रे नागरीकांपर्यंत घरी न पोहोचविता ती परस्पर उघड्यावर फेकून दिल्याचे दिसून येत असल्याचे देखील चर्चा धडगाव परिसरात सुरु आहे. सदर कागदपत्रे उघड्यावर फेकून दिले असल्याचे व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर प्रसारीत झालेले आहे. त्यामुळे या प्रकारातून पोस्ट कर्मचारी हे कामचुकारपणा करीत असल्याचे बोलले जात आहे.संबंधीत कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच बहुतांश नागरीक हे आधारकार्ड दुरुस्ती व विविध कागदपत्रांसाठी ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतर काही मुदतीत त्यांना घरी कागदपत्रे येणार असल्याचे संबंधीतांकडून सांगण्यात येते. सदरची कागदपत्रे पोस्टामार्फत येत असल्यामुळे काही नागरीक पोस्ट कार्यालयातजावून विचारणा देखील करतात. मात्र पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरीकांना उडवा उडवीची उत्तरे देतात.त्यामुळे आपली कागदपत्रे आली की नाही हे अनेक नागरीकांना समजू शकत नाही. जिथे कुणी पोहोचू शकत नाही तिथे पोस्टमन पोहोचू शकतो अशी शाश्वती नागरीकांना आहे. परंतू धडगाव येथे उघड्यावर कागदपत्रे आढळून आल्याने पोस्ट कर्मचारीच कामचुकारपणा करीत असल्याची चर्चा सुरु आहे...