मोटर सायकल चोरट्याला दहा मोटरसायकली सह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरातून घेतले ताब्यात
February 18, 2025
0
धुळे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करत एका सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे. गमदास उर्फ गमा देवराम भिल वय २०, रा. पळासनेर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या दहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत.अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक नंदू वंजारी राहणार हाडाखेड तालुका शिरपूर यांच्या घराच्या अंगणातून त्यांची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गमदास उर्फ गमा देवराम भिल याने हा गुन्हा केला असून तो पळासनेर गावाजवळ थांबला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गमदासला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी गमदासकडून चोरीच्या दहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या मोटरसायकलींची एकूण किंमत ३ लाख २५ हजार रुपये आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहायक उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी, आरिफ पठाण, संतोष हिरे, देवेंद्र ठाकूर, सुरेश भालेराव, पंकज खैरमोडे, पोलीस कॉन्स्टेबल मयुर पाटील, सुनील पाटील यांच्या पथकाने केली.