शंभराहून अधिक महिलांची मोफत कॅन्सर तपासणी
नंदुरबार(प्रतिनिधी)-महिलांनी ताजे व रसायनमुक्त भाजीपाला सेवन करावा, जेणेकरून विषारी रसायनयुक्त भाज्यांमुळे आपल्याला कोणत्याही आजाराला सामोरे जायची गरज भासणार नाही. रोटरी क्लब ऑफ नंदनगरी नेहमी आरोग्य विषयक समारोपयोगी उपक्रम राबवित असते. यापुढे असेच मोफत शिबिर राबवून जनतेची सेवा करावी, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ.हिना गावीत यांनी केले. त्या येथील भव्य मोफत कॅन्सर तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. यावेळी नंदुरबार शहरासह ग्रामीण भागातील सुमारे १०० हुन अधिक महीलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
स्व.शांताबाई जवरीलालजी कवाड, स्व.पुष्पादेवी कल्याण अग्रवाल यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ नंदनगरी नंदुरबार, महावीर दाल ऍण्ड ऑईल मिल दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३५ वर्षांवरील महिलांसाठी भव्य मोफत कॅन्सर तपासणी शिबिर पार पडले. यावेळी माजी खासदार डॉ.हीना गावीत, माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उद्योजक सुरेश जैन, रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियरचे प्रेसिडेंट सौरव अग्रवाल, सचिव प्रवीण महाजन, स्मित हॉस्पिटलचे संचालक निलेश तवर, डॉ.तेजल चौधरी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष सय्यद इसरार, सचिव विवेक जैन आदी उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी देखील कॅन्सर तपासणी शिबिरास उपस्थित महिलांना आयोग्याविषयी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी महिलांची पॅपस्मिअर, मॅमोग्राफी तपासणी सोबतच बी.पी., शुगर, व इतर अनेक प्रकारच्या तपासणी मोफत करण्यात आल्या. गरजू महिलांचे पुढील सर्व उपचार स्मित हॉस्पिटलच्यावतीने मोफत करण्याचे आश्वासन संचालक निलेश तवर व डॉ.तेजल चौधरी यांनी दिले. सोबतच लायन्स फेमीना क्लबच्यावतीने सर्व उपस्थित महिलांना भोजनाची व्यवस्थाकरण्यात आली. शिबिर यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे फकरुद्दीन जलगुनवाला, प्रविण येवले, राहुल पाटील, महेश रघुवंशी, राजेश्वर चोधरी, शिवानी जैन, तस्नीम जलगुनवाला, पायल जैन, अनिता सुर्यवंशी, पुजा ताेष्नीवाल, लायन्स फेमीना क्लबच्या हिना रघुवंशी, सिमा मोडक, सुलभा महिरे, शितल चौधरी, चेतना शहा, रंजना बोरसे, किरण गायकवाड, सुरेखा वळवी, सारीका जमादार, चेतना चौधरी, रागिनी पाटील, प्रिती बडगुजर, आरती बोरसे आदींनी परिश्रम घेतले.