सातपुड्यातील दुर्गम भागात राहणारे अनेक आदिवासी कुटुंब कच्च्या कैरीपासून तयार करण्यात येणारे आमचूर विक्री करून आयुष्याच्या गाळ हाकत असतात मात्र सध्या हवेचा वेग हा १२ ते १६ किलोमीटर प्रतितास याप्रमाणे आहे. त्यामुळे कोवळे मोहर हवेच्या वेगात तुटून खाली पडत आहेत. काही भागांतील झाडांवर बुरसीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे अनुभवी आदिवासी कुटुंब त्यावर फवारणी करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. सातपुड्यात हजारो आंब्याची झाडे असून प्रत्येक आदिवासी कुटुंबाकडे किमान एक तर जास्तीत जास्त १० ते १५ आंब्यांची झाडे आहेत. काहींकडे 2 ते 3 पिढ्यांपासून झाडे आहेत. कच्च्या कैरीपासून तयार करण्यात येणारे आमचूर विक्री करून सातपुड्यातील अनेक कुटुंब आपले वर्षभराचे अर्थकारणाचे नियोजन करीत असतात. याबाबत कृषी विभागानेदेखील मार्गदर्शन करून आंब्याचे होणारे नुकसान टाळावे अशी अपेक्षा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबांकडून व्यक्त होत आहे. पारंपारिक पद्धतीने मोहर गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र हे पुरेशी नसल्याने यावर्षी आंबा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे..........
शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे