वसाहतीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. यावेळी जि.प. कर्मचाऱ्याच्या घरातून सोन्याचे दागिणे व मोबाईल असा एकुण एक लाख २७ हजार रुपयांचा ऐवज एटीएम कार्डसह लांबविला आहे. ही धाडसी घरफोडी प्रशासकिय कार्यालयांच्या परिसरात असलेल्या वसाहतीत घडल्याने चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेतील कर्मचारी कविता यशवंत अहिरे या टोकरतलाव रस्त्यावरील जिल्हा परिषद शासकिय निवासस्थानाच्या रंगावली बिल्डींग रुम क्र. ६ मध्ये राहतात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला.यावेळी घरातून ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याची अडची तोळे वजनाची मंगळपोत, १६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील झुंबे सव्वा पाच ग्रॅम वजनाचे, २४ हजार रुपये किंमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याचे मनीमंगळसूत्र, ९ हजार रुपये किंमतीची सोन्याचे तीन ग्रॅम वजनाचे लहान मनीमंगळसूत्र, तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल व एसबीआय बँक तळोदा शाखेचे एटीएम कार्ड असा एकुण १ लाख २७ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबत कविता यशवंत अहिरे यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी विरुद्ध भा. न्या. सं. चे कलम ३०५ (ए), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान जगताप करीत आहेत. दरम्यान ही घरफोडी प्रशासकिय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घडल्याने खळबळ उडाली आहे.धाडसी घरफोडी करुन चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे...