तळोदा येथे चोर -चोरी करायला आला व पत्र लिहून गेला- हॉटेल मालकाला एक भावनिक पत्र
तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवरील ‘हॉटेल सोनेरी परमिट रूम अँड बियर बार’मध्ये एका विचित्र चोरीची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. रात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून दारू प्यायली, अन्नपदार्थ खाल्ले आणि न जाता थांबून पोलिसांना व हॉटेल मालकाला एक भावनिक पत्र लिहून गेला
या पत्रात चोरट्याने लिहिले की, "देख कोई तेरे से मेरी जाती दुश्मनी नही है, वो क्या है मेरी हालात ही बेबस है... मुझे इन्सानियत ने कहा से कहा लाकर खडा कर दिया है।" त्याने पुढे लिहिले की, "तुमसे एक बात पूछना है अपने? पोलीस खरंच इमानदार असतात का? चोर खरंच चोर आहेत की चोरांना चोर बनवण्यात आले आहे?" त्याच्या मते, तो जबरदस्तीने चोर बनवण्यात आला आहे, आणि त्याची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे, जी कुणाला सांगून उपयोग नाही.
या पत्रातून त्याने 1999 ते 2001 या काळात शहादा येथे असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा पत्ताही विचारलेला आहे, ज्यामुळे अधिक तपासासाठी हे पत्र महत्त्वाचं मानलं जात आहे. सदर घटना ही फक्त चोरीपुरती मर्यादित न राहता एक सामाजिक प्रश्न उपस्थित करत आहे – की चोर हा जन्मतः चोर असतो की परिस्थितीने बनवलेला?
सध्या हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत असून, लोक त्यातल्या भावनिक आणि सामाजिक बाजूवर चर्चेत मग्न झाले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासात आहेत.