नवापूरच्या 'भाग्यवान' शास्त्रीनगरचा 'अभागी' रस्ता: बारासनी माय आणि खाटल्यावर जीव जाई..
नवापूर प्रतिनिधी-(हेमंत पाटील)
नवापूर शहरात नावापुरतं शहर आणि त्यातलं शास्त्रीनगर आहे नावाप्रमाणेच काहीतरी 'शास्त्रीय' पद्धतीनं इथल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडलंय की काय, असा प्रश्न पडतो. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत एवढा मोठा भाग, पण दुर्दैवानं या भागाच्या नशिबी आले आहेत सहा-सहा नगरसेवक, हो, बरोबर ऐकलंत, सहा, काय नशीबवान शास्त्रीनगर, नाही का..? पण हे 'भाग्य' काही इथल्या एका रस्त्याच्या वाट्याला आलं नाही, उलट तो रस्ता या 'भाग्या'चा बळी ठरला आहे.या शास्त्रीनगरमधून शहराच्या बाहेरून जाणारा एक रस्ता आहे, जो थेट जनता पार्क आणि मंगलदास पार्कला जोडतो. एकेकाळी या रस्त्याला 'अच्छे दिन' होते. तत्कालीन नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांच्या कार्यकाळात तो रस्ता बनवला गेला होता. अंदाजे २०१४-२०१५ च्या सुमारास त्यानं आकार घेतला असावा. एका पंचवार्षिक निवडणुकीचा साक्षीदार असलेला हा रस्ता, आज स्वतःच आपल्या 'अस्तित्वा'ची भीक मागतोय.
आता या रस्त्याची अवस्था काय आहे, हे विचारू नका. त्याला रस्ता म्हणावं की खड्डयांचं साम्राज्य, हेच कळत नाही. पण याहून वेदनादायक गोष्ट म्हणजे, जेव्हा या प्रभागातील माजी नगरसेवकांना रहिवाशी तथा मतदार हात जोडून सांगायचे, "साहेब, रस्ता बनवून द्या हो !", तेव्हा त्यांचं एकच रेडिमेड उत्तर असायचं – "भाऊ, तो रस्ता माझ्या भागात नाही,अरे व्वा ! काय ही 'लोकप्रतिनिधी'ची अजब व्याख्या,नगरसेवक एका प्रभागातून निवडून येतात, पण त्यांच्या 'भागात' फक्त काही ठराविक गल्ल्याच येतात की काय? मग उरलेल्या रस्त्यांवर कोणाचा अधिकार?
आणि या 'राजकीय' कबड्डीमध्ये भर म्हणून, नगरपालिकेनेही आजवर या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. म्हणजे, नगरसेवक म्हणतो 'माझ्या भागात नाही', आणि नगरपालिका म्हणते 'आम्ही लक्ष दिलं नाही'. मग या रस्त्याचा बाप कोण.? त्याची आई कोण? असा प्रश्न त्या बिचाऱ्या रस्त्यालाच पडला असेल.आता मतदारांनी सांगा, आपल्या मराठीतील ती म्हण – 'बारासनी माय आणि खाटल्यावर जीव जाय' असे म्हण लागू होत आहे शास्त्रीनगरच्या या रस्त्याचं दुःख बघून, त्या म्हणीचा अर्थ अधिकच गडद वाटू लागतो. एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जातात, स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवली जातात, पण दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या बेफिकिरीमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एक साधा रस्ताही धड बनत नाही, ही वस्तुस्थिती किती दाहक आहे,कधीतरी या रस्त्यावरून चालताना, मनात विचार येतो, या 'अभागी' रस्त्यावरच्या खड्डयांमधून जात असताना, नवापूरचे 'भाग्यवान' नागरिक कधीतरी आपल्या 'सहा-सहा' नगरसेवकांना जाब विचारतील का? की तेही 'हा रस्ता माझ्या भागात येत नाही' असंच म्हणून डोळे मिटून घेतील? या प्रश्नांची उत्तरं नवापूरच्या जनतेकडेच आहेत. पण तोवर, या रस्त्याला अजून किती पंचवार्षिक निवडणुका पचवाव्या लागतील आणि त्याचे जीव किती घेतील, हे काळच सांगेल.