विधानमंडळ समिती नंदुरबारमध्ये दाखल-सरकारला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन --अर्जुन खोतकरांचे स्पष्टीकरण..!
@ नंदुरबारमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण-ही तर विरोधकांची चाल-जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा आढावा
राज्याच्या विधानमंडळाची एक ७ सदस्यीय समिती नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली आहे. या समितीत अर्जुन खोतकर, काशीराम पावरा, सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य पाच सदस्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली असून, जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा आढावा आणि स्थानिक समस्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
समितीच्या आगमनादरम्यान 'रूम बुकिंग'वरून एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर समितीचे सदस्य अर्जुन खोतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "सदर कृती ही विरोधकांची चाल असून, माझ्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने कुठलीही रूम बुक केलेली नाही." समितीला जाणूनबुजून अडचणीत आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोपही खोतकर यांनी केला आहे. यामुळे नंदुरबारमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.