Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

पालकमंत्र्यांनी केली नुकसाग्रस्त भागाची पाहणी-;तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश

पालकमंत्र्यांनी केली नुकसाग्रस्त भागाची पाहणी;
तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश


नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : 
राज्यात यावर्षी अवकाळी पावसाचा कालावधी अधिक लांबला असून, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या शेती आणि फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यासोबतच नंदुरबार शहरातील काही परिसरांत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक घरांचे नुकसान केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. 

घटनास्थळी तातडीने भेट
चिंचपाडा, भिलाटी, बंधारहट्टी भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, घरांची पडझड झाली. पालकमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सोबत माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तातडीने पंचनाम्याचे आदेश
पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, “घरांचे आणि शेतीचे नुकसान तात्काळ नोंदवून पंचनामे पूर्ण करावेत. ज्यांचे घरे राहण्यास असुरक्षित आहेत, त्यांना तात्पुरते घरकुल उपलब्ध करून द्यावे.” तसेच त्यांनी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या.

“शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे” पालकमंत्री ॲड. कोकाटे
राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यंदा मौसमी पावसाचे आगमन वेळेपुर्वी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक शेतीच्या कामांची आखणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. “शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासनही पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले.

 
प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले की, “प्रशासनाच्या वतीने योग्य त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोणताही प्रभावित नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही.”

दरम्यान, या पावसात जिवीतहानी झाली नसली तरी काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत.

0000000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.