नंदुरबार (प्रतिनिधी)- नवापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रंगावली धरणावरील पाण्याचे आरक्षण वाढवून धरणावरच सोलर प्लांटसह ईटीपी टाकी बनवण्यासाठी जलसंपदा विभागाची जागा पालिकेला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली
मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवापूर शहराचा विस्तार वाढीव पाण्याचे आरक्षण व ईपीटी टाकीमुळे पाण्याच्या प्रश्न सुटणार आहे.बैठकीला आ. आमश्या पाडवी यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
तापी बुराई योजने संदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील निंभेल व आसाणे येथील दोन्ही धरण जसे पूर्ण होतील तशी योजना कार्यान्वित करण्यात करावी. दोन्ही धरणांमध्ये पाण्याचे सिंचन होऊन ग्रामस्थांना न्याय देण्याच्या भूमिकेवर निर्णय घेण्यात आल्याचे आ.रघुवंशी यांनी सांगितले.
तापी बुराई योजनेतून ठाणेपाडयापर्यंत पाणी आणण्याची मागणी शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केली होती. मूळ योजनेत ठाण्यापाड्याचा देखील समावेश होता. पण आता योजना सरळ बुराईकडे जात असल्याने जलसिंचन विभागाने वगळून टाकली आहे. ठाणेपाड्याचा धरणात पाणी टाकले तर नंदुरबार शहराचा पाण्याचा प्रश्न सुटेल याचा सर्व्हे करावा. याबाबतच्या प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी आहेत असे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.