Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावित;जलजीवन, सिंचन व विद्युतीकरणासाठी शासन स्तरावर बैठक आयोजित करणार-पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावित;जलजीवन, सिंचन व विद्युतीकरणासाठी शासन स्तरावर बैठक आयोजित करणार-पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
नंदुरबार, दिनांक 06 जून, 2025 (जिमाका) :
जिल्ह्यातील जलजीवन मिशन ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आज राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत, तसेच जलजीवन मिशन, सिंचन आणि विद्युतीकरणाच्या कामासंदर्भात शासन स्तरावर मंत्रालय येथे संबंधित खात्यांचे मंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील जलजीवन मिशन, जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कामकाज व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या कामांचा आढावा पालकमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम सुरू करण्याआधी सर्वप्रथम पाण्याचा स्रोत तपासावा, स्रोत नसलेल्या जागी योजना सुरू करण्याऐवजी स्रोत असलेल्या ठिकाणी योजनेचे नियोजन करावे. अपूर्ण योजनांबाबत योग्य मार्ग काढण्यावर भर द्यावा. कुठल्याही परिस्थितीत योजना अपयशी ठरता कामा नये.  धडगाव तालुक्यात विहिरींना पाणी लागत नसल्यामुळे त्या ठिकाणी नर्मदेतून पाणी घेता येते का, त्याबाबतच्या पर्यायावर कार्यवाही करण्यात येईल. विद्युत पुरवठ्याअभावी पाण्याची योजना अपूर्ण असल्यास ती योजना नव्याने करून सोलरवर कार्यान्वित करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. जलजीवन योजनेचा नवीन सर्वे करताना सोलरसह करण्यात यावा. नंदुरबार जिल्ह्यासाठी सरदार सरोवर प्रकल्प व उकाई धरणातून पाणी देण्याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन समस्या सोडविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. जलजीवन योजनेसाठी पाणी तपासून क्षारयुक्त पाणी असल्यास त्या ठिकाणी फिल्टर प्लांटचे नियोजन करावे.

 
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा घेतला आढावा
यावेळी पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे, समाज कल्याण, वित्त विभाग व आरोग्य विभाग या विभागांचा तपशीलवार आढावा घेतला. दुर्गम भागात गाव वाड्यावरील अंगणवाडी मदतनीस भरती बाबत योग्य पर्याय निवडून स्थानिक महिलांची नेमणूक करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. 

विद्युत वितरण कंपनीचा घेतला आढावा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आढावा घेताना पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी चालू वादळामध्ये पडलेल्या विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर यांच्या नुकसानीची माहिती घेतली. ज्या ठिकाणी खांब पडले असतील त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, तसेच शेतकऱ्यांचे जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून देण्याबाबत संबंधित विभागास सूचना दिल्या. ज्यांचे सोलर कनेक्शन प्रतिक्षेत असतील त्यांना त्वरित सोलर कनेक्शन देण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी 398 कोटी रूपये मंजूर आहेत. त्यातील 50 कोटी प्राप्त झाले आहेत. जवळपास 400 वाड्या आणि सुमारे 30 गावांमध्ये विद्युतीकरणाची गरज आहे. त्यासाठी अजूनही काही निधी प्रतिक्षेत आहे. पुरवणी बजेटमध्ये जिल्ह्यासाठी किमान 100 कोटींची तरतूद करण्याची विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री तथा आमदार डॉ.  विजयकुमार गावित, आमदार आमश्या पाडवी यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

0000000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.