मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सी-६० जवानांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना अत्याधुनिक अशी एके-१०३ शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल, बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान करण्यात आली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही मुख्यमंत्र्यांनी केली.
आपल्या पोलिस दलाने अवघ्या २४ तासात कवंडे आऊटपोस्टचे निर्माण केले. हे केवळ पोलिस ठाणे नाही, तर शासन प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आहे. जेथे सुरक्षेची कमतरता होती, तेथे पोलिस ठाणे उघडत शासन-प्रशासन जनतेपर्यंत पोहोचविले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ४ वर्षांपासून नक्षल भरती पूर्णपणे थांबली होती. पण, अन्य राज्यातून ती व्हायची. पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय कठोर पाऊले उचलली आणि आता नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस