अपघातामुळे दुतर्फा असलेली वाहतूक ठप्प.. रेल्वे गेटचे मोठे नुकसान..
नवापूर प्रतिनिधी
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चिंचपाडा येथे एक मालट्रक (क्रमांक: टी एन जे 1154) भरधाव वेगात असताना थेट रेल्वे गेटला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या धडकेमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रेल्वे गेटला धडक दिल्याने गेटचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या इतक्या वेळानंतरही वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता, अशी माहिती मिळाली आहे. यामुळे नागरिकांनी, वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.
या अपघातामुळे चिंचपाडा परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.