नवापूरच्या खडकी ते पिंपळा रस्त्याच्या दर्जावर गंभीर आरोप
एक कोटींच्या निधीचा होतोय गैरवापर? ग्रामस्थ संतप्त; चौकशीची मागणी
विसरवाडी -
नवापूर तालुक्यातील खडकी ते पिंपळा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत दोन किलोमीटर लांबीचा डांबरीकरण रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र, या रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, डांबराऐवजी ऑइल वापरले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सद्यस्थितीत या रस्त्याची पहिली लेयर तयार करण्यात आली असून, केवळ काहीच दिवसांत ती उखडून गेल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात हा रस्ता तग धरू शकेल का? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
##चौकटीत..
कोट्यवधींचा निधी, पण दर्जा शून्य!
खडकीपाडा ते पिंपळा या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून सुमारे एक कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. हा निधी गरीब आणि आदिवासी बहुल भागाच्या विकासासाठी असूनही, प्रत्यक्षात अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
“आम्हाला असा निकृष्ट दर्जाचा रस्ता नको आहे. आमच्या गावात दर्जेदार काम झाले पाहिजे,” अशी मागणी ग्रामस्थांनी जोरदारपणे केली आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..?
या कामात ठेकेदारांनी निकृष्ट सामग्री वापरून गुणवत्तेचा बळी दिला असून, या कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. ठेकेदाराला पाठीशी घालणारे कोण आहेत, याचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे.
तपास व कारवाईची मागणी -
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, अशा प्रकारच्या गैरकारभारामुळे तालुक्यातील विकासकामांवर विश्वास उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.