फळे, फुले, मसाला पिके आणि जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी अर्ज करावे -सी. के. ठाकरे
नंदुरबार, दिनांक 10 जून, 2025 (जिमाका) :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 साठी फळे, फुले, मसाला पिकांची लागवड आणि जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सी. के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या अभियानाचे अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला पिके यांची लागवड, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू आणि आवळा यांसारख्या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि अळिंबी (Mushroom) उत्पादन प्रकल्पांची स्थापना यांचा समावेश आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा, 8-अ उतारा, आधारकार्डची झेरॉक्स, आधारकार्ड संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स व अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्राची झेरॉक्स आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांना विदेशी फळे, फुले, मसाला लागवड आणि अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करायची आहे, तसेच ज्यांच्याकडे आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू आणि आवळा या फळपिकांच्या बागा आहेत, त्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in यावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000000000