बालेकिल्ला कायम राखण्यासाठी एकजूट आवश्यक-आमदारांच्या कार्यकर्त्यांना मौलिक सल्ला.
काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
नवापूर (प्रतिनिधी): नवापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आणि भविष्यातही तो अबाधित राहणार आहे, असा विश्वास आमदार शिरीषकुमार नाईक यांनी व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत विजय मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने नवापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी होते.
यावेळी खासदार ॲड. गोवाल पाडवी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक, कार्याध्यक्ष दिलीप नाईक, युवानेते प्रफुल्ल नाईक, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष ललिता वसावे, करिष्मा नाईक, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. गावित, तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या शंका व सूचनांना नेत्यांनी समर्पक उत्तर देत त्यांचे समाधान केले. बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, जिल्हास्तरावरील विविध सेलचे प्रतिनिधी, नवापूर शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, आजी-माजी नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, मार्केट कमिटी व शेतकरी सहकारी संघाचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.