वाघारे वस्तीतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा संघर्ष: प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शिक्षण हक्क धोक्यात
नवापूर प्रतिनिधी-(हेमंत पाटील)
महाराष्ट्र: शिक्षणाचा हक्क प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार असला, तरी नवापूर तालुक्यातील करंजाळी ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या वाघारे वस्तीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा संघर्ष करून तो मिळवावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अत्यंत धोकादायक बनला असून, त्यांना दररोज नेसू नदी पार करावी लागते, ज्यामुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
जीवघेणा नदीप्रवास:
शिक्षणासाठीचा थरारक अनुभव
वाघारे वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी शाळेपर्यंतचा मार्ग म्हणजे एक थरारक अनुभव. खांद्यावर दप्तराचे ओझे आणि हातात वडिलांचा आधार घेत, ही मुले दररोज नेसू नदी ओलांडून शाळेत जातात. या नदीवर कोणताही पूल किंवा साकव नाही. फक्त वाहत्या पाण्यातून मार्ग काढत, हे चिमुकले अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून शाळेत पोहोचतात. पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच बिकट होते. नदीला पूर आल्यावर पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढतो, आणि लहान मुलांना पोहता येत नसल्याने त्यांच्या वडिलांचा हात हाच त्यांचा एकमेव आधार असतो. "पाण्याचा प्रवाह कितीही जोरात असला, तरी बाबांनी धरलेला हात सोडायचा नाही," या एका विश्वासावरच ही मुले दररोज शाळेची वाट धरतात.
मंजूर झालेला पूल केवळ कागदावरच..
वाघारे वस्तीजवळील नेसू नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी पूल मंजूर केला होता. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही आजतागायत त्या पुलाचे केवळ खड्डेच खोदले गेले आहेत. प्रत्यक्ष पुलाचे काम कधी सुरू होणार, हा प्रश्न स्थानिक रहिवाशांना सतावत आहे. या प्रशासकीय अनास्थेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षाची किंमत जीव धोक्यात घालून चुकवावी लागतेय..
वाघारे वस्तीतील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत, निवेदने दिली आहेत आणि आपल्या मागण्या मांडल्या आहेत. मात्र, आजवर यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे चिमुकल्यांचा शिक्षणाचा मार्ग खडतर आणि धोकादायक बनला आहे.
आशेचा किरण आजही तेवत
एवढा संघर्ष सोसूनही, या चिमुकल्यांच्या डोळ्यात आजही एक आशेचा किरण दिसतो. 'कधीतरी आमचे हाल कोणाच्यातरी लक्षात येतील आणि आमच्यासाठी सुरक्षित प्रवासाची सोय होईल,' असा विश्वास आजही त्यांच्या मनात जिवंत आहे.
हा प्रश्न केवळ पायाभूत सुविधांचा नाही, तर मानवी जीवनाचा आहे.
प्रशासनाने आणि लोक प्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन, पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी वाघारे वस्तीतील नागरिक आणि पालकांनी केली आहे. शिक्षणाचा हक्क सुरक्षितपणे मिळणे हे मुलांचे स्वप्न नसून, त्यांचा अधिकार आहे आणि वाघारे वस्तीतील या चिमुकल्यांचा जीवघेणा संघर्ष लवकरात लवकर संपावा, हीच अपेक्षा आहे.
(चौकट करणे)
गेली अनेक वर्षे वाघारे वस्तीतील नागरिक दळणवळणाच्या समस्येने त्रस्त आहेत. सध्या नदीतील पाणी कमी असल्यामुळे ती पार करणे शक्य होते, पण मुसळधार पाऊस पडल्यास संपूर्ण वस्ती पाण्यामुळे अडकून पडते.यामुळे रुग्णांचे हाल होतात, शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास सुरू होतो आणि शेतकऱ्यांची कामे ठप्प होतात. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन मंजूर झालेल्या पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी आमची नम्र विनंती आहे. यामुळे वाघारे वस्तीतील नागरिकांना या त्रासातून कायमची सुटका मिळेल.
- जगदीश गावित, ग्रामस्थ करंजाळी