नंदुरबार जिल्ह्यात गर्भवती महिलेची बांबूच्या झोळीतून ७ किलोमीटर पायपीट: विकासाचा अभाव की नशिबाचा फेरा..?
नवापूर प्रतिनिधी--
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर, तिला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रामस्थांना तब्बल ७ किलोमीटरची पायपीट बांबूच्या झोळीतून करावी लागली. गावात रस्ता नसल्याने कोणतीही वाहनव्यवस्था किंवा रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही, ज्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या घटनेने आदिवासी बांधवांच्या जीवनसंघर्षाचा आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
बुरीनमाळपाडा हे गाव दुर्गम भागात असल्याने तेथे पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे पाऊस असो वा इतर कोणताही प्रसंग, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात पोहोचवणे अत्यंत कठीण होऊन बसते. या घटनेत, प्रसूतीवेदना सुरू झालेल्या महिलेला तातडीने उपचारांची गरज असताना, ग्रामस्थांनी माणुसकीच्या नात्याने तिला बांबूच्या झोळीत घालून, डोंगर-दऱ्यांमधून पायी चालत प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर येथे नेले.
ग्रामस्थांच्या या धडपडीतून त्यांचा एकच सवाल समोर येतो: "मानव जन्माला दोष द्यायचा की नशिबाला कोसावे?" स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आदिवासी पाड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. पक्के रस्ते, दळणवळणाची साधने आणि आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या या बांधवांचे जीवनमान कधी सुधारणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
या घटनेमुळे शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष पुन्हा एकदा ग्रामीण आणि दुर्गम भागातील विकासाकडे वेधले गेले आहे. रस्ते आणि आरोग्य सुविधांचा अभाव हा या भागातील आदिवासींच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. अशा परिस्थितीत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, या गावांमध्ये कायमस्वरूपी रस्ते बांधणे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. आदिवासींच्या विकासासाठी आखलेल्या योजना कागदावरच न राहता, त्या प्रत्यक्षात उतरणे महत्त्वाचे आहे.