@ नवापूरच्या भगवान जगन्नाथ रथयात्रेत आमदार शिरीषकुमार नाईक तल्लीन होऊन नाचले. भाविकांसोबत धरला ठेका..!
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), नवापूर यांच्या वतीने आज भगवान जगन्नाथ यांची भव्य रथयात्रा शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. हजारो भाविकांनी या रथयात्रेत सहभाग घेतला होता, ज्यामुळे नवापूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.रथयात्रेत नवापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या जोशपूर्ण सहभाग पाहायला मिळाला त्यांनी भाविकांसोबत
ठेका घेऊन रथ ओढला.
रथयात्रेची सुरुवात दुपारी २ वाजता हनुमान मंदिरापासून झाली.फुलांनी आणि रंगीबेरंगी वस्तूंनी सजवलेला भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि बंधू बलदेव यांचा रथ भाविकांनी जयघोषात ओढण्यास सुरुवात केली. 'हरे कृष्ण, हरे राम' च्या गजराने आणि मृदंग, टाळ यांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. राम मंदिर गल्ली येथे सोन्या हनुमान मंदिरा तर्फे फुग्यांचा व फुलांच्या वर्षाव करण्यात आला.
रथयात्रा नवापूर शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली आणि भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी भाविकांनी रांगोळ्या काढून आणि पेढे वाटून रथयात्रेचे स्वागत केले.
याप्रसंगी इस्कॉनचे अनेक संत आणि पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भगवान जगन्नाथ यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती लाभो अशी प्रार्थना केली. रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
संध्याकाळी रथयात्रा नगरपालिका टाऊन हॉल येथे पोहोचल्यावर महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नवापूर येथील या भव्य रथयात्रेमुळे शहरात धार्मिक एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. इस्कॉनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे नवापूरकरांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले.