नवापूरमध्ये पहिल्यांदाच आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल नामाचा गजर,भव्य पायी दिंडी पालखीत मुसळधार पावसातही नवापूरकर भक्तीरसात चिंब
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर नवापूर शहर प्रथमच विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमले. ज्येष्ठ कवी भीमराव गढरी यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य पायी दिंडी सोहळ्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात नवापूरकर पूर्णपणे रंगून गेले होते.
मुसळधार पावसातही अभूतपूर्व उत्साह..
आषाढी एकादशीच्या सकाळी आदर्श नगरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरापासून या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. प्रारंभी ज्येष्ठ कवी भीमराव गढरी यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पाऊसाची संततधार सुरू असतानाही 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' च्या गजरात दिंडी मार्गस्थ झाली. पुरुष, महिला आणि युवक मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते. अनेक भाविक विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन नाचत-गात मार्गक्रमण करत होते. पावसाने अधिकच जोर धरला असला तरी, भाविकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. उलट, विठ्ठल नामाच्या भक्तिरसात ते चिंब भिजून अधिकच तल्लीन झाले होते.
नवापूरच्या प्रमुख मार्गांवरून दिंडीचे स्वागत
नवापूर शहराच्या प्रवेशद्वारापासून कॉलेज रोड, त्यानंतर नेहरू गार्डन मार्गे दिंडी शिवराम पाटील नगरातील विठ्ठल-रखुमाई मंदिराकडे मार्गस्थ झाली. वाटेत अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक दिंडीचे स्वागत करत होते. जागोजागी भाविक दिंडीमध्ये सहभागी होऊन विठ्ठलाची आरती करत होते. अनेक ठिकाणी भाविकांनी प्रसादाचे वाटप केले.
शिवराम पाटील नगरात सोहळ्याची सांगता
मुसळधार पावसातही दिंडी शिवराम पाटील नगरातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात पोहोचली. या ठिकाणी असंख्य महिला भाविकांनी दिंडी पालखीचे उत्साहात स्वागत केले. मंदिरात दिंडी पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले आणि भाविकांनी विठ्ठलाची आरती केली. शिवराम पाटील नगरातील मंदिरात सकाळपासूनच विधीवत पूजा आणि आरतीचे कार्यक्रम सुरू होते. दिंडी मंदिरात पोहोचल्यानंतर हरीश पाटील व दर्शन पाटील यांनी दिंडीतील भाविक भक्तांचे स्वागत केले. महाआरतीनंतर उपस्थित भक्तांना फराळाचे वाटप करून या भव्य पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
नवापूर शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारे भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पावसाची पर्वा न करता नवापूरकरांनी दाखवलेला उत्साह आणि विठ्ठलाप्रती असलेली त्यांची अपार श्रद्धा यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. या दिंडीमुळे नवापूर शहरात एक वेगळेच आध्यात्मिक चैतन्य संचारले होते.