एक पेड माँ के नाम' या उपक्रमांमुळे पालक व विद्यार्थी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी होणार प्रेरित
नवापूर: येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नुकतीच इको क्लबची स्थापना करण्यात आली. या उपक्रमांतर्गत, पर्यावरण संरक्षणाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांना सहभागी करून घेण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले.
'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेखाली शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. निमदर्डा येथील पालक श्रीमती रीना रोहिदास गावित आणि विद्यार्थिनी प्रियांशी यांच्या हस्ते एका रोपट्याचे वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर, शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी आणि उपमुख्याध्यापक ए. एन. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने वृक्षारोपण केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक अशोक रजाळे आणि गोविंदा कोळी यांचीही उपस्थिती होती.
यावेळी, गाव पातळीवरील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विविध वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली. मुख्याध्यापिका श्रीमती कमल कोकणी आणि उपमुख्याध्यापक ए. एन. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना इको क्लब अंतर्गत वृक्षारोपणाचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना आपापल्या परिसरात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने रोपे स्वीकारली आणि आपल्या घर परिसरात ती लावून त्यांचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.