संतप्त नागरिक; सरपंचाच्या
प्रसंगावधानामुळे वाचले तरुणाचे प्राण
नवापूर, प्रतिनिधी [दि १४ जुलै ]:
नवापूर तालुक्यातील खेरवे गावाजवळ झालेल्या एका दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या तरुणाला १०८ रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले. यामुळे संतप्त नागरिकांनी आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने रुग्णवाहिका सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
काय घडले नेमके...?
खेरवे गावाजवळ एका दुचाकी अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला. मात्र, खांडबारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विसरवाडी येथून रुग्णवाहिका पाठवली जाईल असे आश्वासन देण्यात आले, परंतु एक तास उलटूनही ती घटनास्थळी पोहोचली नाही.
सरपंचांच्या मदतीमुळे वाचले प्राण...
रुग्णवाहिका न आल्याने जखमी तरुणाची प्रकृती अधिकच खालावत होती. अशा परिस्थितीत खांडबारा येथील सरपंच अविनाश गावित यांनी माणुसकी दाखवत आपल्या खाजगी वाहनाने जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे तरुणाला वेळेवर उपचार मिळू शकले.
नागरिकांमध्ये तीव्र संताप
या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. "नागरिकांच्या जीवाची किंमत आहे की नाही?" असा संतप्त सवाल विचारला जात आहे. १०८ रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे यापूर्वीही अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खांडबारा आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेच्या अनुपलब्धतेमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक वेळा जीवितहानी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह...
या गंभीर प्रकारानंतरही आरोग्य विभाग किंवा संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. "रुग्णवाहिकाच नसेल तर आकस्मिक परिस्थितीत रुग्णांचे जीव कसे वाचवायचे?" असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका सेवा सुरळीत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आरोग्य विभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.