नवापूर प्रतिनिधी:
नवापूर बस स्थानकाच्या मागील बाजूला खासगी वाहनांनी वेढा घातला असून, या अनधिकृत पार्किंगमुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. नवापूर एसटी आगार प्रमुखांचे या गंभीर समस्येकडे अद्याप लक्ष कसे गेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर बस स्थानक परिसरातील रस्त्यांचे चारही बाजूंनी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, हे काम करत असताना रस्त्यांवर पडलेली माती आणि इतर कचरा तसाच पडून आहे. याचबरोबर, काँक्रिटीकरणामुळे बस स्थानकाच्या मागील बाजूस खासगी वाहने सर्रासपणे उभी केली जात आहेत, ज्यामुळे बस स्थानकाला खासगी वाहनांनी वेढा घातल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
बाहेरून येणाऱ्या एसटी बसेस स्थानकात वेगाने प्रवेश करतात आणि गोल वळसा घेऊन फलाटासमोर थांबतात. अशा वेळी, बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या खासगी वाहनांना बसची धडक लागून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती बस स्थानकावरील प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर स्थितीवर आगार प्रमुखांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी या अनधिकृत पार्किंगवर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.