नंदुरबार – येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार प्रेप शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यास पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. पोदार प्रेप च्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रमुख अतिथी म्हणून मा. वैशाली जगताप , वित्त लेखाधिकारी, नगरपालिका, नंदुरबार या उपस्थित होत्या. पोदार प्रेप च्या छोट्या विद्यार्थ्यांनी "कहानी और कला का उत्सव जम्बो के संग" यावर आधारित विविध राज्यातील कला प्रकार हे नाट्य आणि नृत्य यामधून सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे नियोजन सौ प्रतिक्षा गोसावी आणि प्रेप च्या सर्व शिक्षकांनी केले.
त्यानंतर पोदार इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी "नृत्य तरंग" आणि "आझादी की याद में" या विषयावर नाट्य आणि नृत्य सादर केली. भारतातील विविध राज्यामधील नृत्य प्रकार हे इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी सादर केले तर इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना नाट्य आणि नृत्य सादर करून अभिवादन केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लाला लाजपतराय, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस, यांच्यावर आधारित नाट्य आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपअधीक्षक श्री संजय महाजन, उपशिक्षणाधिकारी डॉ युनूस पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री गणेश मिसाळ हे उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत पोदार शाळेचे मुख्याधापक श्री अजय फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना संजय महाजन म्हणाले की शालेय जीवनात विद्यार्थ्यांना नाट्य, नृत्य याबरोबर भारतीय कला आणि स्वातंत्र्याचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे तेव्हाच आजच्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि भारतीय कलांबद्दल आदर निर्माण होईल.
कार्यक्रमावेळी शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेचे शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. काही पालकांनीही यावेळी भारतीय नृत्य, गीते, आदींच्या माध्यमातून बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्रशासकीय अधिकारी श्री सचिन हळवे, समन्वयक श्री संदीप कुटे, श्री अल्ताफ फकीर, सौ भाग्यवती साळवे, कार्यक्रम समन्वयक सौ शीतल समर्थ आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आणि सर्वांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.