.

नवापूर शहरातील श्री गणपती मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी
February 02, 2025
0
चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचा माघ महिन्यातील जयंती उत्सव नवापूर येथे भक्तीपुर्ण वातावरणात व उत्साहात संपन्न करण्यात आला. यानिमित्त श्री गणेश मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी 'श्रीगणेशजयंती' म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने नवापूर येथील सरदार चौक भागात असलेल्या प्रसिद्ध व नवसाला पावणाऱ्या श्री गणपती मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त गणपती मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. गणपती बाप्पांच्या वाढदिवस गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. श्री गणपती बाप्पा चे मंदिर विविध फुल व फुग्यांनी सजवण्यात आले होते. विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान करण्यात येऊन भक्तांचे स्वागत करण्यात आले.सकाळी ८ ते ११ वेळेत सहस्त्रावर्तन करण्यात आले तसेच श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले. मंदिराचे पुजारी अजित पाथरकर यांनी विधिवत पूजा विधी करून आरती केली.प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी गणपती मंदिराच्या शेजारी भव्य मंडप टाकून अस्तित्व ग्रुपच्या महिला भगिनींनी श्री गणेश प्रांगणात मोठ्या भक्तीमय वातावरणात सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले.त्याचप्रमाणे शहरातील गणेश भक्तांनी एकत्र येऊन गणपती बाप्पांची विविध गीते गाऊन संगीतमय भजन सादर केले. श्री गणपती मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत एकच गर्दी केली होती. असंख्य भाविक भक्तांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमा साठी गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश काळु पाटील, उपाध्यक्ष गणपत हिरामण पाटील, सचिव सतीश मेघनाथ लाड, खजिनदार सतीशभाई बन्सीलाल शहा यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. गणपती मंदिर परिसरात भक्ती मय वातावरण तयार झाले होते.