केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व नंदुरबार तालुका विधायक समितीचे जी टी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जी टी पी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा यशस्वीरित्या पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद् घाटन माननीय जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा. आ. भैय्यासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी, व्हा. चेअरमन मा. आ. बाळासाहेब मनोजजी रघुवंशी, तसेच जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, जी टी पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. यू. पाटील, डॉ. एस. पी. पाटील, श्री. टी. जी. पाटील उपस्थित होते. सदर मेळाव्यात एकूण सुमारे ११२६ युवकांनी सहभाग नोंदवला व एकूण ५२६ युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली.
माननीय कुलगुरू महोदयांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाचे प्लेसमेंट सेल व ट्रेनिंग सेंटर यांच्या माध्यमातून विविध कंपनीसोबत करार करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार कसा प्राप्त करून देते येईल या दृष्टिकोनातून विद्यापीठ प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त करून त्यांच्या विकासावर भर देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मा. जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी यांनी रोजगाराची संधी प्राप्त करून घेण्यासाठी आलेला युवकांना सर्व शुभेच्छा देत म्हटले की नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व ग्रामीण भागातील युवकांना विविध कंपनीतर्फे रोजगारा ची संधी मिळणे ही एक आनंदाची बाब आहे. बेरोजगारीची वाढती समस्या बघता रोजगार निर्मितीवर जास्तीत जास्त भर कसा देता येईल याकडे शासन विविध महाविद्यालयातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच मिळालेल्या संधीच आपणास सोने कसे करता येईल या दृष्टिकोनातून सर्वांनी अथक परिश्रम घेऊन आपणास रोजगाराची संधी प्राप्त करून घेण्याचे आव्हान देत शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात नंदुरबार तालुका विधेयक समितीचे चेअरमन मा. भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांनी सांगितले की, बहुसंख्य तरुणांचा कल हा शिक्षक पेशाकडे व ठराविक क्षेत्रात आहे पण त्या क्षेत्रपलीकडे विविध कंपनीच्या माध्यमातून आपणांस रोजगार कसा प्राप्त करता येईल हे देखील तरुणांनी समजून घेणे गरजेचे आहे. एका दिवसात कुणी यशस्वी होत नसत तर त्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करणेदेखील गरजेचे असते. युवकांना रोजगार प्राप्त करताना येणाऱ्या विविध अडचणी व समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
विविध कंपन्या एका छताखाली येऊन कॅम्पस इंटरव्यू द्वारे आपणास नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे एक मोठं व्यासपीठ या माध्यमातून आपणा सर्वांना उपलब्ध होत आहे असे सांगून तरुणांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. आयुक्त (कौशल्य रोजगार विभाग ) श्री. विजय रिसे यांनी केले. आभार कबचौउमवि चे सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ. रमेश सरदार यांनी मानले. सूत्रसंचलन डॉ. माधव कदम यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समन्वयक श्री. केशव परदेशी, कबचौउमवि, जळगांव येथील प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथील प्रतिनिधी, जी. टी. पाटील महाविद्यालयातील सर्व समिती सदस्य, ट्रायबल महाविद्यालयाचे विविध प्रतिनिधी यांनी अथक परिश्रम घेतले.