हेमंत पाटील नवापूर
शहरातील मेन रोड, लाईट बाजार, अरुंद गल्ल्यात मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीच्या बोजवारा...
नवापूर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून यावर उपायोजना करण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन कोणतीही पावले उचलतांना दिसत नाही. मध्यंतरी झालेला प्रयत्न त्यानंतर तीच परिस्थिती दिसून आली. मात्र वाहतूक समस्या सोडण्यासाठी गंभीरपणे उपायोजना करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. नेहमीच वर्दळीच्या भाग म्हणजे शहरातील मेन रोड, लाईट बाजार , नगरपालिका कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग, नारायणपूर रोड,मच्छी मार्केट रस्ता, शितल सोसायटी मार्ग दरम्यान विविध दुकाने, भाजी मार्केट, लोरीधारक असल्याने दिवसभर खरेदीसाठी या भागात ग्राहकांची वर्दळ असते. हा रस्ता अरुंद असून इतर दुकाने अरुंद गल्ल्यांमध्ये आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी सतत प्रत्ययाला येते. त्यात वाहनांच्या संख्येत जास्त भर पडली आहे.दरम्यान या रस्त्यावरून तालुक्यातील व शहरातील वाहनधारक शाळा, महाविद्यालय शासकीय कार्यालय, गुजरातकडे व पुढील गावासाठी, अमरधाम कडे व इतर भागातून येऊन या रस्त्यावरून जातांना अनेकवेळा चक्काजाम सारखी परिस्थिती होते. या चक्काजाम मध्ये अनेक वेळा भांडणे व मारामाऱ्याही झाल्या आहेत. लाईट बाजार, मेन रोडवर दिवसभरात अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. या मार्गावरून अंत्ययात्रा अमरधाम कडे घेऊन जाण्यासाठी ही अनेक वेळा मोठी कसरत करावी लागते .या मार्गावर वाहतूक पोलीस दिसून येतात व वाहतूक कोंडी सोडतात तर कधी नागरिक ही पुढे येतात. मात्र इतर भागाचे काय..? हा प्रश्न समोर येतो. मुख्य मार्गावर वाहनधारकांमध्ये वाद होतात त्यासाठी मोठ्या वाहनांची वाहतूक मिळवण्याची मागणी होती. त्यामुळे जड वाहन या मार्गावर बंद करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चार चाकी वाहनांना प्रतिबंध करावा..
मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्यावरून चार चाकी वाहनांना बंदी करण्याची मागणी पुन्हा करण्यात येत आहे. शहरातून जड वाहनांना प्रवेश बंद केल्यास वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवता येईल तसेच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या दुचाकीसाठी पार्किंग सुविधा झाल्यास त्याच्या परिणाम वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी होईल.
@शहरातील मुख्य मार्गावर व इतर भागात पार्किंगची सुविधा व्हावी..
नवापूर शहरातील मेन रोड, लाईट बाजार तसेच इतर भागांमध्ये शक्य होईल त्या ठिकाणी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केल्यास त्याच्या परिणाम वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी होईल. त्यासाठी या परिसरात पार्किंग करण्यासाठी जागेची पाहणी करून तसे नियोजन करणे गरजेचे आहे