lनंदुरबार (प्रतिनिधी)- शिवधाम उद्यान लोकार्पण सोहळ्यानिमित्त नंदुरबारात १ लाख रुद्राक्षांचे वाटप करायला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत रुद्राक्षाचे वाटप सुरूच होते. इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर रुद्राक्ष वाटपामुळे शिवभक्तांच्या कुंभ नंदनगरीत भरवल्याचे जाणवले.
नंदुरबार नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या स्टेशन रोड परिसरात शिवधाम उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त ३ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी सकाळी ९ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटपाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, जि.प माजी सभापती विक्रमसिंह वळवी,जि.प माजी सदस्य देवमन पवार,माजी सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक किरण रघुवंशी,यशवर्धन रघुवंशी,कुणाल वसावे,रवींद्र पवार,दीपक दिघे,सोनिया राजपूत,मोहित राजपूत,शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, विजय माळी,जगन माळी,प्रकाश माळी, योगेश माळी यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहाटेपासूनच रांग
धार्मिक दृष्टिकोनातून रुद्राक्षला मोठं महत्त्व आहे त्यामुळे रुद्राक्ष घेण्यासाठी शिवभक्तांच्या पहाटे पासूनच रांग लागल्याचे पाहायला मिळाले.यात महिलांची संख्या अधिक होती.
शिवभक्तांच्या भरला मेळा
शिवधाम उद्यान परिसरात शुक्रवारी रुद्राक्ष वाटप प्रसंगी जिल्हाभरातून भाविक भक्त आले होते. 'हर हर महादेव','श्री शिवाय नमोस्तुभ्यम', 'बोल बम का नारा है, बाबा तेरा सहारा है' अशा घोषणा देऊन भाविकांकडून महादेवांच्या जयकारा करण्यात आला. हाट दरवाजा ते नेहरू पुतळा चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने शिवभक्तांच्या मेळा भरल्याचे पाहायला मिळाले.
चौकट
15 क्विंटलच्या मसालेभातचे वाटप
मोठ्या प्रमाणावर रुद्राक्षांचे वाटप होणार असल्याने भाविकांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने जेवणाची सोय करून देण्यात आली होती. हाटदरवाजा परिसरात ८ ते १० टेबल वितरणासाठी लावण्यात आले होते.१५ क्विंटल मसाले भातचे वाटप करण्यात आले.
सकाळपासूनच लांबलचक रांगा
शिवधाम उद्यानाच्या बाहेर रुद्राक्ष वाटप करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सकाळपासूनच लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. दुपारी गर्दी ओसरल्यानंतर २ तासानंतर लगेचच पुन्हा साडेतीन वाजता वाटपाला सुरुवात झाली.रात्री रुद्राक्षाचे उशिरापर्यंत वाटप करण्यात आले. उन्हापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी मंडप उभारण्यात आला होता. मंडपात पुरुष व महिला भाविकांची स्वतंत्र रांग करण्यात आली. या ठिकाणी वेळोवेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सूचना देत होते.
रुद्राक्ष वाटप प्रसंगी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रुद्राक्ष देण्यात आले. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता