तुमचे आई-बापच तुमचे खरे देव आहेत -जिवंतपणी त्यांची सेवा करा---मुलांना न कळलेले आई- वडील' या विषयावर प्रा. वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी व वास्तवदर्शी व्याख्यान..
आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा,त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर फोटोतील आई- बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा, तुम्ही कोणत्याही देवाचा पुढे कितीही रुपये ठेवले तरीही तो देव तुमच्या आयुष्यात परत तुमच्या आई बापाला आणणार नाही. त्यांच्या जिवंतपणे त्यांची सेवा करा, कारण तेच खरे देव आहेत, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त आमदार शिरीषकुमार नाईक व नंदुरबार जि.प. माजी अध्यक्षा.रजनीताई नाईक तथा नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे (सांगली) यांचे मुला मुलींच्या आयुष्याला दिशा देणारे प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम सरदार चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हंकारे सरांच्या लक्षवेधी व्याख्यानाने व लक्षणीय उपस्थितीने कार्यक्रम सक्सेसफुल झाला.असंख्य नागरिकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.प्रा. वसंत हंकारे म्हणाले की, आपण कृतज्ञता विसरून चाललोय ज्या आई-बाबांनी आपल्याला जन्म दिला, ज्या मातीने आपल्याला वाढवल-घडवलं,ज्या महापुरुषांनी या मातीमध्ये आपल्या रक्ताचा अभिषेक केला, आपण त्यांना विसरत चाललोय.आपल्याला या मातीचे, आई-वडिलांचे आणि या महापुरुषांचे, महामानवांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून चांगला माणूस म्हणून जगायचं आहे. माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीतच होत असल्याचे सांगितले. या विशेष कार्यक्रमात वसंत हुंकारेंनी 'मुलांना न कळलेले आई- वडील' या विषयावर ही हृदयस्पर्शी व वास्तवदर्शी व्याख्यान दिले. त्यांच्या भावनिक व परिणाम कारक शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले आणि उपस्थित माता-भगिनींचे अश्रू अनावर झाले. हंकारे यांनी आपल्या प्रभावी शैलीत आई- वडिलांचा त्याग, मुलांसाठी त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांचे महत्त्व आणि मुलांना त्यांच्या प्रेमाची जाणिव कशी उशिरा होते, यावर मार्मिक भाष्य केले. त्यांच्या प्रत्येक शब्दाने उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श केला. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मुलांना आई-वडिलांच्या भावनांचा पूर्ण अर्थ उशिरा कळतो, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रमिलाताई पाटील, माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील, काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा करिष्मा नाईक, अध्यक्ष सुधीर निकम, सचिव महेंद्र जाधव उपस्थित होते. यावेळी सेवाभावी कार्य करणाऱ्या यशवंत छात्रलयाचे प्रमुख राकेश भंगाळे व वृषाली भंगाळे यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर निकम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.आय जी पठाण यांनी केले तर आभार महेंद्र जाधव यांनी मानले.