रूग्ण दगावल्याने नोबल रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
एक दिवसीय तालुक्यातील खाजगी वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवेसह काम बंद आंदोलन
रुग्णावर उपचार सुरू असताना नातेवाईकांनी केली डॉक्टरांना मारहाण; गुन्हा दाखल.
नवापूर प्रतिनिधी
नवापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करीत डॉक्टरांनाही मारहाण केली.या तोडफोडीत वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले.याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील नोबेल हॉस्पिटल येथे डॉ.अजय कुवर यांच्याकडे गुजरात राज्यातील सुंदरपुर येथील राजूभाई फात्याभाई गामीत यांच्या श्वास घेण्यास त्रास व छातीत दुखावा असल्याने उपचारासाठी आणले होते. मात्र रुग्णाच्या काही वेळानंतर मृत्यू झाला. दरम्यान डॉक्टर वेळेवर आले नसल्याचे आरोप करत मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड सुरू केली.यावेळी त्यांना आवक घालण्यासाठी आलेल्या डॉ.अजय कुवर यांना मारहाण व शिवीगाळ केली. तोडफोडीत रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले. तोडफोड व मारहाणीच्या प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. रुग्णालयात आणलेल्या व्यक्तीवर डॉक्टर रुग्णालयात येईपर्यंत सहकारी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केला.त्यानंतर डॉक्टरांनी देखील उपचार केला परंतु त्यात राजूभाई गामीत या व्यक्तीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करत रुग्णालयात तोडफोड केली. या प्रकरणी डॉ कुवर यांच्या फिर्यादीनुसार मयत रुग्णाच्या सहा अनोळखी नातेवाईकांवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=======:
नवापूर तालुका डॉक्टर असोसिएशन सह विविध संघटने कडून घटनेचा निषेध ======
नवापूर शहरातील नोबेल मल्टी हॉस्पिटल येथील डॉक्टर अजय कुवर यांच्यावरती दिनांक 11 मार्च रोजी रुग्ण दगावल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली या घटनेचा निषेध व संबंधितांवर कडक कारवाई होऊन भविष्यात अशा घटना घडू नये या मागणीसाठी नवापूर तालुका डॉक्टर असोसिएशन,महाराष्ट्र राज्य,आदिवासी डॉक्टर असोसिएशन,इंडियन मेडिकल असोसिएशन नवापूर,नवापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव व नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना या संघटनेमार्फत निवेदन देत डॉक्टर कुवर यांच्यावर झालेला हल्ल्याचा निषेध करत संबंधित हल्लेखोरांवरती तात्काळ कार्यवाही होऊन भविष्यात अशा घटना घडू नये अशी मागणी या संघटनेतर्फे करण्यात आली आहे.दि 13 मार्च 2025 पर्यंत संबंधित हल्लेखोरावर कारवाई झाली नाही तर दिनांक 13 मार्च 2025 रोजी एकदिवसीय नवापूर तालुक्यातील सर्व खाजगी वेदकीय सेवा, अत्यावश्यक सेवेसह काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.