Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

उष्मालाट व उष्माघातापासून सावध राहा-जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन

उष्मालाट व उष्माघातापासून सावध राहा”
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन

नंदुरबार- (जिमाका) :
नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 37 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून वाढत्या उष्मामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

उष्मालाटेमुळे उष्माघाताचा धोका संभवतो, तसेच मानव, पशू-पक्षी व शेती पिकांवर याचे विविध दुष्परिणाम उद्भवू शकतात. उष्माघाताची प्रमुख लक्षणे म्हणजे शरीरास घाम येणे, वारंवार तहान लागणे, शरीर शुष्क व थकवा येणे, ताप येणे, अधिक ताप वाढणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन अवस्था, कधी कधी बेशुद्ध अवस्था किंवा उलट्या होणे, शरीराचे तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन शरीरातील नियंत्रण कमी होणे, व वेळप्रसंगी मृत्यूदेखील होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले.

उष्माघात टाळण्यासाठी दुपारी 12.00 ते 3.30 या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे, लहान मुले किंवा पाळीव प्राणी बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत, गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे, शारीरिक श्रमाची कामे व उन्हात काम करणे टाळावे, उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक घेऊ नयेत, उन्हात वाहने चालवणे व ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

उष्माघातापासून बचावासाठी तहान नसली तरी भरपूर पाणी प्यावे, हलके, सुती, सच्छिद्र कपडे वापरावेत, गॉगल्स, टोपी, छत्री, बूट व चप्पल वापरावी, प्रवासात पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवावी, डोक्यावर टोपी किंवा पांढरा रुमाल बांधावा, ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा, शरीरातील पाणी कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबूपाणी यांचे नियमित सेवन करावे, पशू व पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे व पुरेसे पाणी द्यावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेड वापरावे, रात्री घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे अशी लक्षणे ओळखावीत व लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींची अधिक काळजी घ्यावी, पाणपोई सुविधा उपलब्ध करून द्यावी, कॉंक्रीट घराच्या छतावर पांढरा रंग व पत्र्याच्या छतावर गवताची पेंढी/धान्याचा कडबा घालावा व स्वयंपाकघरातील दारे-खिडक्या खुल्या ठेवाव्यात, असेही डॉ. सेठी यांनी सांगितले आहे.

उष्माघात झालेल्या व्यक्तीस तत्काळ ओल्या कपड्याने पुसून शरीराचे तापमान कमी करावे. मदतीसाठी 108, 112, 102 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. रुग्णाला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

0000000000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.