महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – प्रा. डॉ. मृणाल जोगी.
जागतिक महिला दिनानिमित्त नवापूर नगरपालिका महिला व बालकल्याण विभाग आणि डे.एन.यू.एल.एम. यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कल्याण योजना व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सुरुपसिंगजी नाईक टाऊन हॉल येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महिला बचत गटांच्या सदस्यांनी स्वागत गीताने केली. तसेच राजमाता जिजाऊ, झांशीची राणी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मृणाल जोगी यांनी महिलांनी आत्मनिर्भर होऊन कौटुंबिक व सामाजिक प्रगती साधावी, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे, असे सांगितले. महिला दिनानिमित्त ८ महिला बचत गटांचा सन्मान प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी प्रशांत भट यांनी केले, तर आभार मिनाक्षी वळवी यांनी मानले.