नंदुरबार जिल्ह्यात SQAAF नोंदणीला मोठा प्रतिसाद
जिल्ह्यातील 2098 शाळांपैकी 1801 शाळांनी School Quality Assessment and Accreditation Framework (SQAAF) साठी नोंदणी पूर्ण केली असून, त्यांनी मानके भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या स्व-मूल्यमापन प्रक्रियेमुळे शाळांना आपल्या बलस्थाने (Strengths) आणि सुधारणा करण्याजोग्या बाबी (Weaknesses) समजून शाळेच्या विकासासाठी आवश्यक दिशानिर्देश ठरविता येतील.
SQAAF अंतर्गत करण्यात येणाऱ्या गुणवत्तामूल्यांकनामुळे शाळांना स्वतःच्या प्रगतीचा आढावा घेता येईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी योजना आखता येतील. सर्व शाळांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या शिक्षणाची गुणवत्ता उंचावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नोंदणी वाढीसाठी समन्वयकांची जबाबदारी
नोंदणी वाढवण्यासाठी जिल्हा समन्वयक विनोद लवांडे, अधिव्याख्याता डॉ. युनुस पठाण, उपशिक्षणाधिकारी श्री. रमेश गिरी, विस्तार अधिकारी हे जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच प्रत्येक गटशिक्षणाधिकारी आपल्या तालुक्यातील शिक्षकांना प्रोत्साहित करून नोंदणी वाढविण्यासाठीप्रयत्नशील आहेत.
शिक्षक क्षमतावृद्धी 2.0 प्रशिक्षणात मोलाचे मार्गदर्शन
डाएट प्राचार्य डॉ. भारती बेलन, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. प्रविण अहिरे, अधिव्याख्याता श्री. प्रदीप पाटील, डॉ. वनमाला पवार, डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. बाबासाहेब बढे, अधिव्याख्याता श्री. सुभाष वसावे यांनी प्रशिक्षणास भेट देऊन SQAAF संदर्भात मार्गदर्शन केले.
SCERT पुणे येथून प्रशिक्षित राज्य सुलभक प्रा. डॉ. उमेश शिंदे यांनी प्रत्यक्ष काम करताना शाळांना भेडसावणाऱ्या समस्या, ऑनलाइन माहिती भरण्याच्या अडचणी आणि सांघिक सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले.
शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुवर्णसंधी
SQAAF कार्यक्रमामुळे शाळेतील कमतरता आणि गुणवत्ता सुधारण्याच्या संधी ओळखण्यास मदत होते, असे मत श्री. पंकज पाठक यांनी व्यक्त केले. यामुळे फक्त निकाल आणि टक्केवारीवर भर न देता विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करता येईल, असे त्यांनी सांगितले.प्राचार्य, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार यांनी सांगितले की, SQAAF मुळे शाळांना आपले उद्दिष्ट स्पष्ट करता येईल आणि विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी निर्माण होईल.
उपप्राचार्य मोहन अहिरराव, डी. आर. जुनियर कॉलेज, नंदुरबार यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि प्रशासन एकत्र येऊन शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी कार्य करू शकतात. शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणा दिशेने महत्त्वाचे पाऊल
SQAAF कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केल्यास शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, असे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच नंदुरबार जिल्ह्यातील शाळांसाठी दिशादर्शक ठरेल.