निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव मोहन देसले यांची नवापूर तालुक्यातील शाळांना भेटी..!
नवापूर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यासाठी शासनाने ५ मार्च, २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करून इयत्ता २ री ते ५ वी साठी शासन निर्णयात परिशिष्ट जोडून कृती आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यानुसार उपक्रम अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वाचन स्तरावर प्रगत विद्यार्थी आणि पालक यांच्या सहभागाने आज जिल्ह्यात चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाच्या आढावा घेण्यासाठी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव मोहन देसले यांना नंदुरबार जिल्ह्यासाठी शिक्षण आयुक्तांनी नियुक्त केले होते. त्यांनी जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, पानबारा, कै. हेमलताताई प्राथमिक विद्यालय, विसरवाडी आणि वनवासी विद्यालय, चिंचपाडा या शाळांना भेटी देऊन उपक्रम अंमलबजावणी आणि विद्यार्थी गुणवत्ता तपासणी केली.श्री. देसले यांनी शासन निर्णयाच्या वाचनापासून ते आठवडे निहाय कृती कार्यक्रमाची माहिती घेतली. त्या अनुषंगाने शाळेत उपलब्ध सर्व अभिलेख तपासणी करून स्तरनिहाय विद्यार्थ्यांना प्राप्त लेखन, वाचन आणि गणन कौशल्याची फेर तपासणी केली. तपासणी अंती पालकांशी संवाद साधत शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्या सोबत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, विसरवाडी बिट चे विस्तार अधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख राकेश देसले, मुख्याध्यापिका सीमा पाटील उपस्थित होते.