जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी सर्वांना आधुनिक तंत्रज्ञान शिकावे, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन कामकाजात वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग सन 2024-25 28 एप्रिल सेवा हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शहादा तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारीया, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे ॲङ सागर घाटे, प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यावेळी बोलतांना म्हणाल्या, जिल्ह्यात आपले सरकार केंद्राची संख्या कमी असल्याने सेवा हक्क कायद्यासाठी लोकसंख्येनिहाय एस.एस.सी. केंद्रे आहेत, त्यांना आपले सरकार सेवा केंद्रे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या प्रत्येक सेवा या केंद्रामध्ये मिळतील. तसेच एकाच जागेत सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी किंवा मोबाईल ई-सेवा केंद्र जे लोकांच्या घरी जावून सेवा देवू शकतील याची संकल्पना असून प्रशासन त्यावर काम करत आहे.
सेवा हमी कायद्याची कार्यपद्धती कशी राहीली पाहिजे यासाठी जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या भागात सेवांचा अभाव आहे अशा भागात विशेषता धडगांव अक्कलकुवा या तालुक्यातील प्रत्येकी 25 गावांसाठी सेवा हमीचा प्रकल्प करण्यात येणार असून यामध्ये लोकांचे मॅपींग करुन त्यांना घरोघरी कशी सेवा देता येईल याबाबत काम करण्यात येणार आहे. पोलीस विभागासोबत एक प्रकल्प तयार करण्यात आला असून धडगांव अक्कलकुवा भागातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये एक खिडकी उघडण्यात येणार असून या खिडकीद्वारे त्या तालुक्यातील नागरिकांचा शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. या गोष्टी प्रामुख्याने सर्वांच्या सहभागाने जिल्ह्यात राबवावचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीमती सेठी यांनी यावेळी सांगितले.
उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारीया यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, वेळेत सेवा देणे हा सेवा हक्क कायद्याचा महत्वाचा भाग असून वेळेत सेवा न दिल्यास अधिकाऱ्यांना शिक्षा होवू शकते तसेच दुर्गम भागातील व्यक्तींना वेळेत सेवा दिल्यास त्यांना वेळोवेळी चकरा मारावे लागणार नाही असे सांगितले.
उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे ॲड. सागर घाटे, यांनी या कायद्याच्या कायदेशिर बाबींची माहिती दिली व या कायद्यात काय करावे काय करु नये याविषयी सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या अनुषंगाने सन 2024-25 या वर्षात अधिसूचित सेवा नियत कालावधीत देवून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, तहसिलदार दिपक धिवरे (तळोदा), दिपक गिरासे (शहादा), दत्तात्रय जाधव (नवापूर), नायब तहसिलदार राजेश अमृतकर (नंदुरबार), दिलीप गांगुर्डे (अक्कलकुवा) व किसन गावीत (अक्राणी).
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने घ्यावयाची शपथ घेतली. आभार नायब तहसिलदार संदीप सोनवणे यांनी मानले.
0000000000