गडदाणी येथे बनावट देशी-विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त
@ विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांची संयुक्त कारवाई.. परिसरात खळबळ..!!
नवापूर प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार यांच्या संयुक्त पथकाने नवापूर तालुक्यातील गडदाणी गावात मोठी कारवाई करत बनावट देशी व विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करून तब्बल १० लाख ७९ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १३ मे २०२५ रोजी सपोनि नरेंद्र साबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गडदाणी येथील अमृत पंतु गावीत याच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरात बनावट दारू तयार केली जात आहे. माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाईचे नियोजन करून, विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह छापा टाकला.
घराच्या आत तपासणी केली असता, प्लॅस्टिक टाकीतून नळीच्या साहाय्याने १८० मि.ली.च्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून, मशीनद्वारे त्यावर पॅकिंग करून दारू तयार केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी यावेळी पवन सिताराम शर्मा (वय ३३), हरिष राजेंद्र चौधरी (वय ३७), अमृत पंतु गावीत (वय ३३) या तिघांना ताब्यात घेतले. तसेच, त्यांना कच्चा माल पुरविणारा आरोपी हुसेनभाई धुळेवाला असल्याची माहितीही समोर आली आहे.
या छाप्यात बनावट दारू, साहित्य व एक वाहन असा एकूण १०,७९,८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल लिनेेश विष्णू पाडवी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि नरेंद्र साबळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईसाठी विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे यशस्वी कामगिरी केली.