गंगापूर शिवाराजवळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर अमली पदार्थांचा मोठा ट्राला जप्त, चालकाला अटक
विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त कारवाई
नवापूर प्रतिनिधी
गंगापूर शिवाराजवळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत अमली पदार्थांचा मोठा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विसरवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालक्ष्मी हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. बेंगळूरुहून गुजरातकडे सोलर प्लेट्स घेऊन जाणाऱ्या जी.जे.27 टी.डी 3586 क्रमांकाच्या एका ट्रॅक्टर-ट्रॉलीला पोलिसांनी थांबवून तपासणी केली.तपासणी दरम्यान, सोलर प्लेट्समध्ये प्लास्टिकच्या चार मोठ्या पिशव्यांमध्ये अफिमसदृश्य अमली पदार्थांचा माल 'अमल दोंडा' भरलेला आढळला. संपूर्ण ट्राला प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेला होता. घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, चार पिशव्यांमध्ये एकूण ८० किलो 'अमल दोंडा' असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी चालक रूपचंद प्रजापत (रा. मांगणे की ढाणी, जि. बाडमेर) याला ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या मालाची बाजारात लाखो रुपये किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. नशा करणारे लोक 'अमल दोंडा' पाण्यात मिसळून त्याचे घट्ट मिश्रण करून पितात, ज्यामुळे त्यांना नशा येतो.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड आणि लिनेश पाडवी यांच्या पथकाने केली. घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी सूचना दिल्या आहेत.