शहादा तालुक्यातील कहाटुळ येथे प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोगस कापुस बियाण्यांची पाकीटे विक्री करतांना कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत सुमारे पाच लाखाच्या रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून खाजगी इसम हा शहादा तालुक्यातील कहाटूळ येथील मोहन पाटील व योगेश पाटील यांच्या राहते घरी प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करतांना रंगेहाथ मिळून आला. याबाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके यांच्या तक्रारीवरुन मोहन पाटील व उत्पादक कंपनीविरुध्द तसेच मोहीम अधिकारी सचिन देवरे यांच्या तक्रारीवरुन योगेश पाटील व उत्पादक कंपनी यांच्याविरुध्द बियाणे कायदा १९६६. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, नंदुरबार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चेतनकुमार ठाकरे, नंदुरबार कृषी विकास अधिकारी किशोर हडपे नाशिकचे तंत्र अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक उल्हास ठाकूर, कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक कल्याण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी स्वप्नील शेळके, मोहीम अधिकारी सचिन देवरे, शहादा पं.स.चे कृषी अधिकारी सुरेश साठे,कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे, योगेश हिवराळे,पेंढारकर,महेश विसपुते, खर्डे,पराडके यांच्या पथकाने केली.दरम्यान प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गय केली जाणार नाही, असा कडक इशारा नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी दिला आहे