कोंडाईबारी अपघात: दिलीप नाईक यांचा प्रशासनाला अल्टीमेटम, आठ दिवसांत महामार्ग सुधारा, अन्यथा...आंदोलन
नवापूर: धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात झालेल्या भीषण एसटी बस अपघाताने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि या महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांवर काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
"कोंडाईबारी घाटातील अपघात अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस आहे. वारंवार अपघात होऊनही महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा गंभीर दखल का घेत नाही? या अपघातातील निष्पाप प्रवाशांच्या जीवांना जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल कॉग्रेस पक्षा जिल्हाकार्यध्यक्ष दिलीप नाईक यांनी उपस्थित केला.
धुळे-सुरत महामार्गावरील धोकादायक परिस्थितीवर नाईक यांनी प्रशासनाला कठोर शब्दांत इशारा दिला, "महामार्ग प्राधिकरण विभागाने या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष आता सहन केले जाणार नाही. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही."
वाकीपाडा पुलाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना नाईक म्हणाले, "वाकीपाडा पुलावर मोठे भगदाड पडले आहे आणि गेल्या दोन वर्ष सुध्दा झाले नाही या पुलावर खड्डे पडने सुरु झाले आहे . या धोकादायक परिस्थितीमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरण काय करत आहे? अजून किती निष्पाप लोकांचे बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे?"
दिलीप नाईक यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. "येत्या आठ दिवसांत जर महामार्गावरील प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर नाईलाजाने आम्हाला हा मार्ग कायमस्वरूपी बंद करावा लागेल," असा इशारा त्यांनी दिला आहे.
दिलीप नाईक यांच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे