नवापूर तालुक्यातील नवागाव येथील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रारंभानिमित्त नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मा. शिरीषकुमार नाईक होते.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी वाद्यांसह प्रभातफेरीने करण्यात आली. “आई मी आश्रमशाळेत जाणार, शिकून घराला पुढे नेणार” या घोषणांनी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी रांगोळी, फुले व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेतील इयत्ता दहावी व बारावी (विज्ञान व कला शाखा) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळेप्रती आकर्षण वाटावे यासाठी ‘मी शाळेत येतोय’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता, जो विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
आमदार शिरीषकुमार नाईक व गटशिक्षणाधिकारी आर. बी. चौरे हे शाळेचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी व्यासपीठावर मनोगत व्यक्त करत आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचे प्रेरणादायी संदेश दिले.