नवापूर शहरात नाले सफाईला गती – मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील यांचे तातडीने पाऊल, नागरिकांत समाधानाचे वातावरण
नवापूर नगरपरिषदेने शहरातील नाले सफाई कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे काम वेगाने सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
शहरातील पावसाचे पाणी नीट वाहून जावे, रस्त्यांवर आणि घरे-गल्ल्यांमध्ये साचू नये यासाठी नाल्यांची सफाई आवश्यक असते. यंदा वेळीच जागरूकता दाखवत नगरपालिका प्रशासनाने जेसीबी मशिनच्या साहाय्याने शहरातील मुख्य व उपनाल्यांची सफाई मोहीम हाती घेतली आहे.
या कामाची सुरुवात नेशनल हायवे ६ पासून झाली असून, पुढे बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यांपासून ते इदगाह मशिदीच्या मागच्या भागापर्यंतच्या संपूर्ण क्षेत्रात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नाल्यांमध्ये साचलेली गाळ, प्लास्टिक, झाडांची वाळकी पाने व अन्य कचरा काढून टाकण्याचे काम सुरु केले आहे.
यावर्षी प्रशासनाने वेळेवर हालचाल केल्यामुळे आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम सुरु केल्यामुळे नाल्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक नागरिकांनी यंदा होणाऱ्या पावसाळ्यात अशा अडचणी येणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे.