"मालेगाव महामार्गावर थरकाप-बस-ट्रकचा भीषण अपघात – अनेक प्रवासी जखमी
बसचे पुढचे चाक आणि ड्रायव्हरच्या कॅबिनचा मोठा भाग अक्षरशः उद्ध्वस्त
मालेगाव राष्ट्रीय महामार्ग (NH-3) वरील फाऊंटन हॉटेलजवळ आज दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. पिंपळगाव डेपोची बस (क्र. MH 14 BT 3327) आणि ट्रक (क्र. RJ 11 GC 3608) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बसचालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, बस नाशिकहून मालेगावकडे जात होती. फाऊंटन हॉटेलसमोरील महामार्गावर ट्रक अचानक डिव्हायडर ओलांडत असताना, बसला जोरात धडकला. धडकेनंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चुरडून गेला. घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरु केले. काही वेळातच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि सर्व जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघात इतका भीषण होता की बसचे पुढचे चाक आणि ड्रायव्हरच्या कॅबिनचा मोठा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. बस चालकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, महामार्गावरील डिव्हायडरजवळ अनेक वाहनचालक अयोग्य पद्धतीने वळण घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अशा घटनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाकडून कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत...