नवापूर बसस्थानकाचे काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरणाचे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असून, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवासी दोघेही त्रस्त आहेत.
बसस्थानक परिसरात आजही मातीचे ढिगारे तसेचच पडून आहेत. बस चालत असताना उडणारी धूळ श्वसनाचा त्रास निर्माण करत असून, विशेषतः मागील गरीब वस्तीतील लहान मुले आणि वृद्ध या प्रदूषणाने अधिक आजारी पडत आहेत. उघडी गटारे आणि अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव वाढला असून, डेंग्यू व मलेरियासारख्या रोगांचा धोका गंभीर आहे.
'स्वच्छ भारत अभियान'ची ध्वनीफीत वाजवणाऱ्या प्रशासनाचे येथे प्रत्यक्षात कुठलेही स्वच्छतेचे प्रयत्न दिसून येत नाहीत. स्वच्छता हे केवळ निवडणूक घोषणांपुरते मर्यादित राहिले आहे, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी थट्टा करणाऱ्या या व्यवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. ठेकेदाराकडून कामांची जबाबदारी निश्चित करून माती हटवणे, गटार झाकणे व नियमित स्वच्छतेसाठी कर्मचारी तैनात करणे हाच याचा योग्य तोडगा ठरेल. अन्यथा, हे सुशोभीकरण नव्हे तर ‘दु:खदुर्भावना’ बनून राहील.