एसटी मधील सर्व प्रवाशांच्या ठरला धोकेदायक प्रवास-प्रवासांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह..
एसटी वाहन चालकाच्या बेफिक्रीपणामुळे अनेकदा प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत तरीसुद्धा यावर अद्याप महामंडळाने उपाय योजना केलेले नाही. त्याबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे
नंदुरबारहून धानोरा येथे जाणाऱ्या पाटीबंधारा एस.टी. बसमध्ये काल दिनांक 11रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. बसचा चालक छोतीराम दामोदर गांगुर्डे हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे बस वारंवार खड्डयांमध्ये आदळत होती, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या धोकादायक प्रवासात बस दोन-तीन वेळा उलटता उलटता वाचली, ज्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले. प्रिया रवि पाडवी (वय १६) हिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून, महिमा अजित वळवी (वय २०) हिच्या छातीत दुखापत झाली आहे. इतर काही प्रवाशांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.
प्रवाशांनी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने ऐकले नाही. सुदैवाने मोठा अपघात टळला, पण प्रवाशांचे जीव धोक्यात आले होते. संतप्त प्रवाशांनी या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यप्रणालीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी दोषींवर तत्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.