गुजरात महाराष्ट्राच्या सेतू नवापूर शहरातील ब्रिटिश कालीन पुल मरणावस्थेचा स्थितीत..
पुलावरील जीव घेणे खड्डे-वाहन चालक जीव मुठीत धरून मार्गक्रमण करीत आहे..
नवापूर प्रतिनिधी---
नवापूर शहरातील ब्रिटिशकालीन पुलाची दयनीय अवस्था आणि त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. हा पूल रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रमुख मार्ग तर आहेच, पण याच पुलावरून शहरातील अनेक लोकप्रतिनिधी सरकारी विश्रामगृहाकडे ये-जा करत असतात. अशा परिस्थितीतही त्यांना या पुलाची दुरवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास दिसत नाही का, असा संतप्त आणि गंभीर प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी असो, की वर्षभर पुलावर साचलेले खड्डे असोत, या सर्व अडचणींचा सामना नवापूरच्या नागरिकांना रोज करावा लागतो. मात्र, ज्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी निवडून दिले आहे, तेच याच मार्गावरून जाताना या समस्येकडे कानाडोळा करत आहेत. 'जनतेच्या समस्यांची जाण असलेले' म्हणून मिरवणाऱ्या या लोकप्रतिनिधींना आपल्याच शहराच्या विकासाची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता नाही का.? सरकारी विश्रामगृहात ये-जा करताना लोकप्रतिनिधींच्या गाड्या याच खड्डेमय पुलावरून जातात. त्यांना धक्के बसत असतील, गाड्यांचे नुकसान होत असेल, तरीही त्यांची डोळेझाक सुरूच आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची ते वाट पाहत आहेत का? निवडून दिल्यानंतर जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे. परंतु, नवापूरमध्ये याचे चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे.
नवापूरची जनता आता लोकप्रतिनिधींना थेट प्रश्न विचारत आहे: "तुम्ही याच पुलावरून जाताना तुम्हाला खड्डे दिसत नाहीत का? तुम्हाला जनतेचा त्रास जाणवत नाही का? की फक्त मतांसाठी जनतेची आठवण येते?" या प्रश्नांची उत्तरे आता लोकप्रतिनिधींना द्यावीच लागतील, कारण जनतेच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे. मध्यंतरी पीडब्ल्यूडी ऑफिस जवळच्या हा ब्रिटिशकालीन पुलाच्या प्रश्न तात्कालीन पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्याचे ऑडिट बाबत सूचना देण्यात आल्या होत्या मात्र अजून ही पूल सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र अधिकाऱ्यांनी दिल्यावर नंतर तो विषय हवेत गुल झाला. सध्या यापुलाची फारच देणे अवस्था झाली असून गुजरात कडे जाण्यासाठी किंवा महाराष्ट्र कडे येण्यासाठी या पुलावरून जाताना जीव मोठे धरून जावे लागत आहे पुलावर पडलेले मोठमोठे खड्डे व झालेली दयनीय अवस्था पाहून पूल मरण अवस्थेत चालल्याचे संकेत मिळत आहे आणि हे एक धोक्याचे संकेत खूप काही सांगून जात आहे. यावर उपाययोजना करणे तेवढेच महत्त्वाचे असून नवीन पूल या ठिकाणी बांधणे तेवढेच गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.