नवविवाहित युवकाच्या खुनाची सीबीआय चौकशी करण्यांची रघुवंशी समाजाची नंदुरबार येथे मागणी
इंदूर येथील नवविवाहित युवकाच्या हत्येचा अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय महापरिषदेचा वतीने निषेध करण्यात आला आहे. युवकाच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करून प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत रघुवंशी समाजाच्या शिष्टमंडळाने आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी सोनम रघुवंशी यांचे शिलाँग (मेघालय) येथून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अपहरण केले होते. त्यानंतर नवविवाहित राजा रघुवंशी यांची हत्या करण्यात आली. घटनेनंतर
सोनम रघुवंशी यांचे अपहरण करण्यात आले. त्यांच्या अजूनपर्यंत थांगपत्ता लागलेला नसून, जीवाला धोका निर्माण झाला आहे. जवळच बांगलादेश सीमा असल्यामुळे मानवी तस्करीची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. अपहरण झालेल्या सोनम रघुवंशी यांच्या शोधार्थ त्यांचे भाऊ दीपक रघुवंशी सहकाऱ्यांसह शिलाँग येथे गेले आहेत त्यांना देखील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमक्या देण्यात आल्या.या घटनेमुळे रघुवंशी समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. नवविवाहित युवक राजा रघुवंशी यांच्या हत्येची तात्काळ सीबीआय चौकशी करावी.मारेकऱ्यांना अटक व्हावी. सोनम रघुवंशी यांच्या सुरक्षित परतीसाठी त्वरित आणि प्रभावी शोध सुरू करावा. सोनम रघुवंशी यांच्या शोधात सहभागी असलेल्या त्यांच्या भाऊ दीपक रघुवंशी व सहकाऱ्यांना पुरेशी
सुरक्षा पुरवावी, अशी मागणी आ.चंद्रकांत रघुवंशी, किशोर रघुवंशी,विलास रघुवंशी, निखिल रघुवंशी, रवींद्र परदेशी, पुष्पेन्द्र रघुवंशी, संदीप रघुवंशी, आनंद रघुवंशी आदीनी केली आहे.